देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट : लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

पुणे : देशाच्या पश्चिम सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यामुळे हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी पुण्यात सांगितले.

संवेदनशील भागांमध्ये सैनिक अत्यंत दक्षतेने पहारा देत असून, उत्तर सीमेवरही सध्या शांतता नांदत असल्याचे द्विवेदी म्हणाले. शहरातील विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅपर्स लष्करी संस्थेच्या मैदानावर भारतीय सैन्यदलाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनरल द्विवेदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असल्याचे सांगित यामध्ये सेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

लष्करप्रमुखांनी भारतीय सेनेतील महिलांच्या उस्फुर्त सहभागाबद्दल देखील कौतुक केले. त्यांनी सांगितले की, महिलांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे. यंदाच्या परेडमध्ये नेपाळी लष्कराच्या बँडचा सहभाग हे दोन्ही देशांमधील लष्करी आणि सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, देशातील जनतेचा लष्करावरील विश्वास अधिक दृढ होत असून, यातूनच सैन्यदलाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरातील विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅपर्स मैदानावर भारतीय सैन्य दलाचा ७७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात भव्य समारंभाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून परेडची पाहणी केली आणि सैनिकांची मानवंदना स्वीकारली. बुधवारी (दि. १५) पार पडलेल्या या कार्यकमावेळी लष्कराचे बहारदार संचलन, आधुनिक लष्करी वाहने, हेलिकॉप्टर आणि रोबोटिक श्वान यांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी लढाऊ तीन सुखोई विमानांनी दिलेली मानवंदना विशेष आकर्षण ठरली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 15-01-2025