संगमेश्वर : देशाच्या भूभागाच्या सीमा जशा सुरक्षित केल्या जातात, याचप्रमाणे सागरी सीमा देखील परकीय आक्रमण परतवण्यासाठी सुरक्षित केल्या जातात. हे काम नौदल सेना करत असते. सीमेवर लढाई करण्या इतकीच जोखीम या दलामध्ये असते. आपल्या देशाचे नौदल प्रचंड ताकदीचे आहे, असे मत नौदलातून सेवानिवृत्त झालेले अमर चाळके यांनी व्यक्त केले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावचे मूळचे रहिवासी असलेले अमर अंकुश चाळके यांनी नौदलामध्ये १५ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. सध्या ते तालुक्यामध्ये शासनाच्या महसूल विभागातील मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याचप्रमाणे माजी सैनिक तालुका संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. आपले वडील हे सैन्यात होते. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्यानंतर अशी सेवा पाहिली होती.

सैन्यातील गंमती जंमती व अनेक आठवणी त्यांनी आपल्याला लहानपणी सांगितल्या. यातूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली, असे चाळके सांगतात. बारावीपर्यंतचे शिक्षण देवरुख महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर घेट १९९३ साली ओडिसा सिल्का येथे आर्मीचे पायाभूत प्रशिक्षण घेतले. यानंतर लोणावळा येथे इंजिनियरिंगचे प्रशिक्षण घेऊन देशाच्या महत्त्वाच्या येथे मरीन इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. बीकॉम, एम.बी.ए., मरीन इंजिनियरिंग या सर्व पदव्या बाह्य शिक्षणाने प्राप्त केल्या. प्रशिक्षण व शिक्षण पूर्ण होताच साऊथ आफ्रिका येथील सोमालिया देशामध्ये अंतर्गत मोठा भडका उडाला होता. यावर युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने या देशातील अराजकता थांबवण्यासाठी संपूर्ण जगातून ७४ हजार सैनिक, युद्धातील सर्व सामग्रीसह तैनात केले. यामध्ये भारत देशातील ५ हजार सैनिक देखील सहभागी झाले होते. यात रेजिमेंटल बिहारमधून आपली नौदल विभागातून नियुक्त करण्यात आली. तब्बल दीड महिना या ठिकाणच्या सागरी सुरक्षेसाठी काम केले. या युद्धात दीडशे भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले. यानंतर पुन्हा भारतात येऊन आयएनएस विक्रांत, आयएनएस गोदावरी अशा जहाजांवर संरक्षणाची सेवा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय संरक्षणाचे काम करत असताना जगातील २३ देश पाहण्याची संधी मिळाली.
राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांची झालेली भेट, देशाचे संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी, काँग्रेसच्या सोनिया गांधी या नेत्यांची देखील भेट या सेवेतून घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या तरुण मुलांना सैन्यात आणण्यासाठी अप्रिबीर ही योजना आणली. या चार वर्षाच्या सेवेनंतर अनेक तरुणांना थेट देशाच्या मुख्य सेवेत सहभागी होता येऊ शकते. यासाठी येथील तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पंधरा वर्षाच्या सेवेत चार मेडल…
सलग ११ वर्षे समुद्रात सेवा वाहिल्यामुळे ‘लॉगस्ट सी सर्व्हिस’ हे मेडल आपल्याला प्राप्त झाल्याचे ते आनंदाने सांगतात. आपल्या १५ वर्षाच्या एकूण सेवेमध्ये ४ मेडल प्राप्त झाली आहेत असे ते आवर्जून सांगतात. १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये देखील देशाची सागरी सुरक्षा सुरक्षित ठेवण्याचे काम करण्याची संधी मिळाली. परदेशातून कोणत्याही प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी ही सुरक्षा महत्त्वाची होती.
इंडियन नेव्ही, एअर फोर्स व आर्मी या तिन्ही दलांमधून परमवीर चक्र मिळवलेले सुभेदार मेजर बाणा सिंग यांची जम्मू काश्मीर येथील लाईट इन्फंट्री येथे सन २००० साली भेट झाली. त्यावेळचा प्रसंग आपल्यासाठी अविस्मरणीय आहे. – अमर चाळके
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 15/Jan/2025
