राजापूर : वाटूळ येथे चित्रकार विजयराज बोधनकर यांची कार्यशाळा

राजापूर : चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर वाटूळ (ता. राजापूर) येथे कार्यशाळा घेणार आहेत.

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण साहित्य संमेलन वाटूळ येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

याच संमेलनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, कवी,लेखक विजयराज बोधनकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन असेल. तसेच ते चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी १ आणि २ फेब्रुवारी रोजी मोफत कार्यशाळा घेणार आहेत. वाटूळ परिसरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी व चित्रकला शिक्षकांनी आपल्या शाळेतील साहित्याची आणि चित्रकलेची आवड असलेल्या मुलांना संमेलनातील प्रदर्शनांना भेट देण्यास सांगावे. तसेच चित्रकला कार्यशाळेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.. १ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ५ आणि दि. २ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत चित्रकला कार्यशाळा असेल. कार्यशाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत चित्रकला कागद किंवा वही, पेन्सिल ,पेन, रंग, ब्रश इत्यादी साहित्य सोबत आणावे, असे सूचित करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक दिनकर गांगल भूषविणार आहेत. संमेलनात अनेक नामवंत लेखक, कवी, नाटककार उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या परिसरात पुस्तक प्रदर्शन व विक्री असेल. इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन, चित्रकार दिगंबर मांडवकर यांचे चित्र प्रदर्शन असेल.

संमेलनास उपस्थित राहणाऱ्या सर्व साहित्यरसिकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून येणाऱ्या साहित्यरसिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांनी विशाल मोरे (95454 81846) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 15-01-2025