व्यक्तिमत्त्व विकासासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक : अमित यादव

संगमेश्वर : प्रत्येक बाल मित्रांनी या शिबिराचा उपयोग नासा इस्त्रो सारख्या परीक्षेसाठी करून आपण आपल्या शाळेतून छोटे वैज्ञानिक निर्माण व्हावेत व खऱ्या अर्थाने या फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे नाव लौकिक करावे, असे प्रतिपादन या शिबिराच्या समारोपप्रसंगी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी केले.

तालुक्यातील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी प्रकल्पस्थळी आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व शिबिराप्रसंगी ते बोलत होते. हे शिबिर बाल मनासाठी संस्कार व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठीही योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन दिवस चाललेल्या या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभवातून विविध फुले, गणितातील गंमती जमती, अनेक क्लुप्त्या, मनोरंजनात्मक खेळ, विज्ञानाच्या कथा, आधुनिक तंत्रज्ञान, डॉक्टर भगवान नारकर यांची तहान नावाची व व्यथा नावाची चित्रफीत, सूर्यनमस्कार, व्यायाम प्रकार, मैदानी खेळ, देशभक्ती, छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता, स्वामी विवेकानंद अशा अनेक विषयांवर नियोजित मार्गदर्शकांनी माहितीतून मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर उपस्थित कडवई येथील अभिनेते व डॉ. भगवान नारकर, सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश धाट, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक देवल, जिल्हा सचिव मंदार जोशी, जिल्हा सहसचिव श्रीधर दळवी यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करत विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहित केले.

यावेळी भारतमाता पूजन कार्यक्रम घेण्यात आला. भारत माता पूजनासंबंधी वक्ते माखजन हायस्कूलचे प्रयोग शाळा सहाय्यक सचिन साठे यांनी मन, मनगट व मेंदू यांच्याशी प्रत्येकाने साम्य ठेऊन आपण आपल्या भारत मातेचे म्हणजेच मातीचे जीवापाड रक्षण केले पाहिजे. हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजले पाहिजे.

शिबिर यशस्वी होण्यासाठी विनायक पाध्ये, अजिंक्य पावसकर, दिलीप काजवे, केतकी पाध्ये, प्रकाश पोंक्षे, प्रमोद बापट, अरुण सरदेसाई, मधुरा सरदेसाई, आदिती काजवे, दिनेश नाटेकर, कोकण प्रांत विषय प्रमुख हेमंत आहीर, राजेंद्र जोशी, मंदार जोशी, संजय काटदरे, रवींद्र खांडेकर, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. चंद्रशेखर देशपांडे, वनिता देशपांडे यांच्या सहकार्याबद्दल अजिंक्य पावसकर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 15/Jan/2025