रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गेली ५२ वर्षे समाजोपयोगी कार्ये करीत असलेल्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने त्यांच्या सेवाकार्यांना चालना देण्यासाठी “लायन्स आर्ट अॅण्ड म्युझिक फेस्ट” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांच्या सहभागातून समृद्ध होणार आहे.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा १९७३ साली स्थापन झालेला पहिला लायन्स क्लब आहे, जो जगभरातील १४ लाखहून अधिक लायन्स सदस्यांसह WE SERVE हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नेत्ररूग्णालय, डायलेसिस सेंटर, पाळणाघर, डायबेटीस डिटेक्शन सेंटर, श्रवण व वाचा दोष उपचारकेंद्र यासारखे कायमस्वरूपी प्रकल्प समाविष्ट आहेत.
लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली १९ वर्षे सुमारे ५०,००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये वर्षाला ३००० ते ३५०० पर्यंत शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्यापैकी जवळ जवळ ६० ते ६५ टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. डायलेसिस सेंटरची सुरुवात फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली आणि आता डिसेंबर २०२४ पासून रत्नागिरीमधील रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा दिली जात आहे.
या सर्व सेवा उपक्रमांसाठी निधी उभारण्याची आवश्यकता असल्याने लायन्स क्लबने निधी संकलन कार्यक्रम आयोजित केले आहेत. “लायन्स आर्ट अॅण्ड म्युझिक फेस्ट” या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे पूर्ण प्रायोजकत्व, सह प्रायोजकत्व, स्वागत कमान, जाहिरातींचे बॅनर इ. प्रकारे सहभागी होऊन आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 16-01-2025
