सहा वार, मणक्यात घुसला चाकूचा तुकडा.. सैफवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी(१५ जानेवारी) रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सैफ अली खानवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मोठी अपडेट दिली आहे.

हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. यामध्ये सैफला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या होत्या. यातील दोन जखमा गंभीर होत्या, दोन ठिकाणी किरकोळ दुखापत झाली होती तर दोन जागी खरचटलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर त्याच्या शरीरातून सुमारे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या अभिनेत्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे.

काय म्हणाले डॉक्टर?

रात्री २ वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाकूच्या तुकड्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली. त्यांच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या मानेवरही जखम झाली होती. त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली.

सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत अपडेट

आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि यातून बरे होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 16-01-2025