मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी अडीच लाख निमलष्करी दलांची केलेली तैनाती म्हणजे “निवडणूक आयोगाचा दहशतवाद” असल्याचे सांगत, लोकशाहीसाठी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी भाजपने साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करत अडीच लाख पॅरा मिलिट्री फोर्स तेथे तैनात केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. “निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या, त्याच धर्तीवर हे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
मोदी-शहांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत, असे स्वतःला म्हणवून घेतात. जर ते इतके लोकप्रिय असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ची किंवा पोलीस दलाच्या धाकाची गरज का भासते? असा सवाल राऊत यांनी केला. “याचाच अर्थ त्यांना आपला पराभव दिसत आहे. पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्व्याप करावे लागत आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मविआचा उमेदवार उद्या जाहीर होणार
विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “आमचा एकच उमेदवार आहे, तो सर्वांचा मिळून आहे. उद्या विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कोण आहे, हे समजेल.” तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात येऊन महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशातील अशांततेसाठी भाजप-संघ जबाबदार
मिरा रोडमधील घटनेवर बोलताना राऊत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “हे फक्त एका धर्माकडून होत नाहीये, तर सर्व बाजूंनी गढूळ वातावरण निर्माण केले जात आहे. देशातील शांतता, सुरक्षा आणि धर्मस्वातंत्र्य संकटात आणायला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जबाबदार आहे,” असा दावा त्यांनी केला.
पत्राचाळ आरोपांना प्रत्युत्तर
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर बोलताना राऊत यांनी भाजपवर पलटवार केला. “ज्यांनी मलिदा खाल्ला ते सध्या भाजपमध्ये किंवा शिंदे गटात आहेत. कोर्टाने मला जामीन देताना आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. माझा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 29-04-2026














