मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने ७ जानेवारी रोजी आराधे आणि उपाध्याय यांच्या नावांची शिफारस केली होती.

न्यायमूर्ती आराधे यांची २००९मध्ये मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. २०११मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. त्यानंतर २०१६मध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात आराधे यांची बदली झाली आणि २०१८मध्ये त्यांनी तिथे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. जुलै, २०२३मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, एप्रिल, २०२४ पासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी सुरुवात झाली आणि १४ ऑक्टोबर २०२४ रोजी याचिकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला होता आणि राज्य महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी युक्तिवादास सुरुवात केली होती. ५ डिसेंबरला पुढील सुनावणी होती पण त्या दिवशी सुनावणी झाली नव्हती.

मराठा आरक्षण; सुनावणीस विलंब होण्याची शक्यता
न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या बदलीमुळे पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भात २०२४मध्ये करण्यात आलेल्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्ण पीठापुढे १४ आणि १५ जानेवारी रोजी होणार होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 16-01-2025