खेड : गावठी दारूची वाहतूक करणारी रिक्षा पकडली

खेड : तालुक्यातील खोपी गावाकडून खेडच्या दिशेने ऑटोरिक्षामध्ये गावठी दारू वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी गुरुवार, दि. १६ रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५५ लिटर गावठी दारू रसायन व एक रिक्षा असा एकूण दोन लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

खेड तालुक्यातील खोपी मार्गावरून रिक्षा (क्र. एमएच ०८ व्ही १८५८) मधून गावठी हातभट्टीच्या दारुच्या रसायनाची बॅरल भरून वाहतूक केली जात असल्याची टीप पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि.१६) रिक्षा थांबवली व तपासणी केली असता त्यामध्ये ४५५ लिटर दारू रसायन सापडले. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी बाबू बाळाजी गोरे (रा. खोपी ता खेड जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गावठी हातभट्टीच्या दारुचे रसायनाचे खेडमध्ये वितरण करण्यात येणार होते, अशी माहिती समोर येत असून, उघडपणे हा अवैध धंदा सुरू असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 17/Jan/2025