रत्नागिरी : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही लोकसहभागातून आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ९३८ वनराई, विजय, कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. यावर्षी ८ हजार ६८५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गतवर्षी दौडशेपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दरवर्षी जिल्ह्यात कच्चे, वनराई व विजयी बंधारे बांधण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही जिल्ह्यात ८ हजार ६८५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षी ६ हजार बंधारे बांधण्यात आले होते. यामुळे थोड्याफार प्रमाणात पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली होती.
गावातून वाहणारे नाले, वहाळ, उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. लोकसहभाग व श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विजयी बंधाऱ्याचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जात आहेत. यंदा अगदी ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावांतून वाहणाऱ्या नदी, नाल्यांचे प्रवाह वेगवान होते. परिणामी, प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी यावर्षी थोडा उशीर झाला.
सध्या ठिकठिकाणी हे बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येग गावाला दहा बंधाऱ्यांचे लक्ष दिले आहे. बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशीरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत ९९४ कच्चे बंधारे, ४६५ वनराई बंधारे, १०३२ विजयी बंधारे बांधण्यात आले आहेत. ही मोहीम फेब्रुवारी अखेरपर्यंत असणार आहे.
ज्या तालुक्यात जास्त टंचाई तोच पाठी…
जिल्ह्यात सध्या बंधारे बांधण्याचे काम जोरदार हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात बंधारे बांधताना दिसत आहेत. ९ तालुक्यांपैकी खेड तालुका वगळता सर्व तालुक्यात बंधारे नियोजित बांधले जात आहेत. जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते. मात्र, हा तालुकाच बंधारे बांधण्यात पाठीमागे आहे. या तालुक्यात १ हजार १४० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र आतापर्यंत फक्त ८२ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 17/Jan/2025
