शिक्षणातून ज्ञान आत्मसात करणे गरजेचे : डॉ. तात्याराव लहाने

चिपळूण : आज शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळेच आज आपण इथपर्यंत येऊ शकलो. मात्र, नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही. ते ज्ञानाच्या माध्यमातून कसे आत्मसात करून उपयोगात आणायचे ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजच्या पिढीने शिक्षणातून ज्ञान घेतले पाहिजे, असे उद्गार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. सावर्डे येथील स्व. गोविंदराव निकम जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेजच्या आवारात गुरुवार, दि. १६ स्व. गोविंदराव निकम जयंती महोत्सव सुरू झाला. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. लहाने, उद्योजक मंदार भारदे, आ. शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, प्रशांत निकम, ऑस्ट्रेलिया येथील एजी मर्चड सव्र्व्हसेसचे ऑलिव्हर मर्चेंड, माजी सभापती समिक्षा बागवे, सचिव महेश महाडिक, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस उपनिरीक्षक जयंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. लहान यांच्या हस्ते गोवळकोट येथील राजे प्रतिष्ठानला स्व. गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

डॉ. लहाने म्हणाले की, सन १९५७ ला संस्थेची स्थापना करून ५० हून अधिक शाळा उभ्या केल्या, त्यामुळे हे कार्य अलौकीक आहे. आपल्या घरी येऊन शिक्षकांनी मुलाला शाळेत घाला म्हणून वडिलांना सांगितले. मात्र, वडिलांनी आधी शेतीला प्राधान्य दिले. दिवसाला एक रूपया मजुरी करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाला हातभार लावत शिक्षण घेतले. रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेखाली एमबीबीएस पूर्ण केले. आजच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे; पण त्यावेळी कुणीही मार्गदर्शन करायला नव्हते. घरची शेती नाही, झोपडीवजा घर. त्यामुळे एका कंडक्टरने मुलगी नाकारली होती. मात्र, एमबीबीएस झाल्यावर आमदार मुलगी देण्यासाठी घरी आले. त्यामुळे मुलांनी चांगले शिका, असे आवाहन केले. निकम कुटुंबीयांचे शैक्षणिक व अन्य क्षेत्रात चाललेले काम या विषयी कौतुक केले. उद्योजक मंदार भारदे यांनीदेखील, मराठी मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभारावा, व्यवसाय करावा. व्यवसाय केला तरच प्रगती आहे या संदर्भात मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 17/Jan/2025