राजापूर : प्रौढ निरक्षकांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नवसाक्षरता अभियान राबवले जात आहे. तालुक्यातील या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून ५७४ प्रौढ निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यांना २४६ स्वयंसेवकांपर्यंत साक्षर होण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या प्रौढ निरक्षरांची पुढील महिन्यामध्ये परीक्षा होणार असून, त्यामध्ये ज्येष्ठांनी वर्षभरामध्ये केलेल्या अभ्यासाचा कस लागणार आहे.
दरम्यान, गतवर्षी झालेल्या परीक्षेतून तालुक्यातील सुमारे एक हजार प्रौढ साक्षर झाले होते. नवसाक्षरता अभियानाची ही यशस्वी निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंचायत समिती शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार, १ कोटी ६३ लाख प्रौढ निरक्षर आहेत. त्यांना २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने शंभर टक्के साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नवभारत साक्षरता अभियान गतवर्षीप्रमाणे यावर्षीही राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आठ लाख प्रौढ निरक्षरांसह देशातील २९ लाख ज्येष्ठांना यंदा साक्षर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नव्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात नवसाक्षरता अभियानांतर्गत नावनोंदणी झालेल्या ज्येष्ठांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तालुक्यामध्ये नवभारत साक्षरता अभियानाची पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामध्ये नवसाक्षरता अभियानासाठी ५७४ प्रौढ निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यांना साक्षर होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्यासाठी २४६ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे साक्षरता दिनापासून अध्यापन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
अशी असेल सर्वसाधारण परीक्षा
नवभारत साक्षरतेची परीक्षा दीडशे गुणांची असणार असून, त्यामध्ये लेखन, वाचन, संख्याज्ञान या घटकांसाठी प्रत्येकी ५० गुण असणार आहेत. एकूण दीडशेपैकी ५० म्हणजे ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या प्रौढांना साक्षर म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. साक्षरता कार्यक्रमात लेखन, वाचन, गणिताबरोबरच डिजिटल व्यवहार, मतदान, कॅलेंडरवाचन, दैनंदिन व्यवहारातील बाबी शिकवल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 17/Jan/2025














