पावस : रत्नागिरी तालुक्यातून हापूसची पहिली पेटी पाठवण्याचा मान पावस महातवाडी येथील शकील उमर हरचिरकर आणि चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांनी मिळवला आहे. हरचिरकर यांच्या दोन पेट्या मुंबईत वाशी बाजारात, तर बंदरींकडून सहा डझनच्या दोन पेट्या अहमदाबाद (गुजरात) मार्केटमध्ये गेल्या आहेत. अहमदाबादमध्ये बंदरी यांना २५ हजार रुपये दर मिळाला.
पावस-महातवाडी येथील शकील हरचिरकर यांच्या गोळप धनगरवाडी येथील बागेतील हे हापूस आंबे आहेत. पेटी लवकर पाठवण्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. एक एकरात ४० हापूस आंब्यांची झाडे आहेत. चार ते पाच वर्षे ते स्वतः योग्य नियोजन करून हापूसची काढणी करतात. भरपावसात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आलेला मोहोर टिकवण्यासाठी तीन ते चार फवारण्या केल्या.
ऊन पडल्यामुळे मोहोराला फळधारणा झाली. त्याचे जतन करत १६ जानेवारीला १० डझन आंबा काढला. आंब्याच्या दोन पेट्या मुंबई, वाशी मार्केटमधील शैलेश नलावडे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवल्या. शुक्रवारी त्या वाशी बाजारात पोहोचल्या. नलावडे यांच्या हस्ते पहिल्या पेटीची पूजा झाली.
चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांच्या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोर आला. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता; मात्र मोहोर वाचवण्यासाठी बंदरी यांनी आठ दिवसांनी फवारणी केली. ऑक्टोबरअखेर फळधारणा सुरू झाली. गुरुवारी (ता.१६) काढणी करून आंबा अहमदाबाद मार्केटला पाठवला.
यंदा दोन पेटी आंबा बाजारात पाठवला आहे. चांगले फळ पाठवून चांगला दर मिळवण्याचा हेतू आहे. मागील दोन वर्षे आंबा लवकर बाजारात गेला. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पावस येथील बागेत सेंद्रिय पद्धतीने झाडांचे संगोपन केले आहे. शकील हरचिरकर, पावस
सप्टेंबरमध्ये आठ दिवस कडक ऊन पडले होते. त्यामुळे झाडाच्या मुळांना ताण बसला तसेच त्या झाडाची पाने पाहिल्यावर मोहोर लवकर येईल, असा अंदाज होता. त्यानुसार नियोजन केले. पहिली पेटी अहमदाबाद येथील मार्केटला पाठवली आहे. – रेहान जब्बार बंदी, चांदराई.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 18/Jan/2025














