प्रजासत्ताक दिनी दिल्लीत एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करणार कोळी नृत्य

रत्नागिरी : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावर्षी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना मिळाली आहे. कृष्णा साईनाथ मानकापे, मयुर विश्वनाथ घगवे (दोघेही वाणिज्य शाखा प्रथम वर्ष) आणि विनय विजय कांबळे (बीबीआय, द्वितीय वर्ष) हे तिघेही कोकणचे प्रसिद्ध कोळी नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.

अथर्व वेद कला मंच रत्नागिरी यांच्या साहाय्याने सत्ता दिनाच्या संचलनात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या सादरीकरणाने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणार आहेत.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून महाराष्ट्रातून ६० कलाकारांची यासाठी निवड करण्यात आली आहे. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणारे कृष्णा मानकापे, मयूर घगवे आणि बीबीआयच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा विनय कांबळे हे तिघेही गेले महिनाभर दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सराव करीत आहेत. या कामी अथर्ववेद परंपरा कला मंचचे प्रमुख लक्ष्मण पडवळ, प्रवीण कदम, प्रथमेश कोतवडेकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या ६० कलाकारांमध्ये तीन विद्यार्थी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी हा महाविद्यालयासाठी आणि शिक्षण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. चेअरमन श्री. हेगशेट्ये संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते यांनी तीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 18-01-2025