बुकिंगमध्ये वाढ झाल्याने आयआरसीटीसी वेबसाइट क्रॅश होत असल्याचा अंदाज

मुंबई : आयआरसीटीसीची वेबसाइट गेल्या काही दिवसांत सातत्याने डाउन होत असल्याने प्रवाशांना तिकीट आरक्षणामध्ये त्रास होत आहे. तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये साडेतीन ते चार पट वाढ झाल्याने वेबसाइट क्रॅश झाली असल्याचा अंदाज आहे.

गेले काही दिवस सकाळी १० ते १२ च्या दरम्यान तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये अचानक वाढ झाली होती.

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर रेल्वेच्या एसी आणि स्लीपर कोचसाठी तत्काळ बुकिंग सर्वोच्च मागणीच्या वेळी दर तासाला सरासरी ५१ हजार ५०० असते; परंतु गेल्या काही दिवसांपासून हाच आकडा १.८६ लाख ते २.२३ लाखांपर्यंत पोहोचला होता. परिणामी अचानक वाढ झालेल्या ट्रॅफिकमुळे वेबसाइटवर ताण आल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. असे असले तरी वेबसाइटवर तांत्रिक बिघाड आहे का, याचा शोध घेण्याचे काम दिल्लीमध्ये आयटी टीम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयआरसीटीसीची पूर्वीची ई-तिकीटिंगप्रणाली नेक्स्ट जेनने बदलली आहे. असे असले तरी ती सातत्याने क्रॅश होत आहे. त्यामध्ये रेल्वे सोडून इतर गोष्टींचे बुकिंगही सुरू करण्यात आल्यामुळे वेबसाइटवर अधिकच लोड येत असल्याचे अखंड कोकण रेल्वे सेवा समितीचे म्हणणे आहे.

आयआरसीटीसीची रेल्वे तिकीट विक्री
२६ हजार तिकीट बुकिंग प्रति मिनिट इतके सर्व्हरची ई-तिकीट बुक करण्याची सरासरी क्षमता आहे.
२०२३-२४ दरम्यान आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे १२.४ लाख तिकिटांची दररोज सरासरी विक्री झाली आहे.
२१ मार्च २०२२ रोजी एका दिवसात १६ लाख ई-तिकिटांची विक्री झाली होती, ती सर्वाधिक होती.

-आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर रेल्वे तिकीट विक्रीसोबतच हॉटेल बुकिंग, विमान तिकीट बुकिंगसारख्या सुविधांचा अधिकचा झेपत नसलेला भार कमी करण्याची गरज असून, फक्त रेल्वे तिकीट बुकिंगसाठी समर्पित सेवा देण्याची गरज आहे.- अक्षय महापदी, अखंड कोकण रेल्वे सेवा समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 18-01-2025