चिपळूण : कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारात समावेश केला असून नमन महोत्सवाला शासनाने ३५ लाख ४७ हजारांचे अनुदानही जाहीर केले आहे. ७ जानेवारीला तसा अध्यादेश काढला आहे. यासाठी संदीप सावंत यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी याची दखल घेत कोकणातील सर्वात पहिले नमन महोत्सव सावर्डे येथे घेतले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळी या कलेला राजाश्रय मिळावा यासाठी सावंत यांनी प्रयत्न सुरू केले. मंत्रालयापर्यंत त्यांनी सलग पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या लोककलावंत पॅकेज अनुदान या योजनेत नमन लोककलेचा समावेश करून योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरल्यास समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक मंडळाला २ ते अडीच लाख तसेच प्रत्येक प्रयोगाला १५ हजारप्रमाणे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते. एका कलापथकास २० प्रयोगासाठी आणि एका आर्थिक वर्षात १० नमन मंडळांना हे अनुदान देण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता; परंतु हा निर्णय लालफितीत अडकून राहिला होता. याबाबत सावंत यांनी पुन्हा पाठपुराव्याला सुरुवात केली होती. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सावंत यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून मंत्रालयात वरिष्ठ पातळीपर्यंत धाव घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ७ जानेवारीला महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण अध्यादेश काढला आहे. त्यानुसार कोकणातील नमन या कलेला शासनाच्या लोककला या प्रकारात समावेश करून नमन महोत्सवाला ३५ लाख ४७ हजार इतके अनुदान मंजूर करण्यात आले.
कला लोप पावण्याची भीती
कोकणात नमन या कलेला फार मोठे महत्त्व आहे. अनेक नमनमंडळे असून, यातून अनेक कलाकारदेखील तयार होत आहेत. ही कला पिढ्यानपिढ्या कायम असून, त्याची लोकप्रियताही टिकून आहे; परंतु या मंडळांना तसेच कलावंतांना राजाश्रय नसल्याने आर्थिक अडचणीबरोबरच समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी, कोकणातील ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. ही कला जोपासण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असे सावंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 18/Jan/2025














