पुढील वर्षापासून ‘सीबीएसई पॅटर्न’ दोन टप्प्यांत राज्यात राबविला जाईल : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

पुणे : ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढा आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राबविण्यात येणार आहे.

इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ सुरू करण्यात येणार आहे, तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोन टप्प्यांत हा पॅटर्न राज्यात राबविला जाईल,” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी भुसे पुणे दौऱ्यावर होते. राज्यात यंदा एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी सुरू आहे. ते म्हणाले, ”विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीला ‘सीबीएसई पॅटर्न’लागू होईल, तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अन्य इयत्तांचा ‘सीबीएसई’नुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल. दरम्यान, या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 18-01-2025