प्रतिक्रांतीतून ‘बौद्ध आयडेंटिटी’ धम्म स्वीकाराने प्राप्त झाली : प्रा. आनंद देवडेकर

चिपळूण : सामाजिक सुधारणा करणे आणि सामाजिक पुनर्रचना करणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या प्रतिक्रांतीतून शेकडो वर्षापूर्वी छिन्नविच्छिन्न झालेली आमची मूळ बौद्ध आयडेंटिटी धम्म स्वीकारानं आम्हाला पुन्हा प्राप्त झाली आहे, आता आम्ही सोडलेल्या धर्मातील रूढी परंपराच्या सुधारणांच्या फंदात न पडता नव्या धम्माला साजेशा सामाजिक पुनर्बांधणीतून ही बौद्ध आयडेंटिटी प्रस्थापित करण्याची भूमिका जबाबदारीने बजवायला हवी, असे स्पष्ट प्रतिपादन तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतिचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांनी येथे केले .

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने तिसरी सम्यक साहित्य कला संगीती महाड येथील गोपाळ बाबा वलंकर साहित्य नगरी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या संगीतीचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार व लेखक विचारवंत प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले.

यावेळी सुभेदार सावदकर सभागृहातील घनश्याम तळवटकर विचार मंचावर प्रबोधिनीचे अध्यक्ष साहित्यिक ज. वी. पवार, सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.संजय खैरे, मुख्य संयोजक मारुती सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते व सुरबा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस, मुंबईचे अध्यक्ष विश्वास पवार, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, रत्नागिरीचे अध्यक्ष संजय गमरे, पालघरचे अध्यक्ष भावेश लोखंडे, ठाणेचे कार्याध्यक्ष धम्मकिरण चन्ने आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक आनंद देवडेकर पुढे म्हणाले, शेकडो वर्षाच्या गुलामीच्या प्रवासात आमच्या कित्येक पिढ्यांच्या निनीवेत असलेला बुद्ध विचार धम्मदीक्षा देऊन जाणिवेत आणून देणाऱ्या युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना या बौद्ध आयडेंटीच संवर्धन करणारी सृजनशीलता कार्यरत झाली. तर महाडच्या या ऐतिहासिक क्रांती भूमीत संपन्न झालेली ही सम्यक साहित्य कला संगीति भावी पिढ्यांसाठीही प्रेरक ठरेल, असा मला विश्वास वाटतो, असे सांगितले.

तर आंबेडकरवादी साहित्यिकांबाबत बोलताना ते म्हणाले , प्रेरणा आंबेडकरी सांगायची आणि प्रवृत्ती मात्र या प्रेरणेच्या विपरीत जोपासायची हा दांभिकपणा झाला. आंबेडकरवादी साहित्य कोणाला म्हणावे ? याविषयी भाष्य करताना ज्येष्ठ समीक्षक स्मृतीशेष हरीश खंडेराव आपल्या समीक्षा ग्रंथात म्हणतात , जातीविरहित समाज व्यवस्था मान्य करून स्वतःवर अंमल करणारा आणि भारतीय संस्कृतीची शाश्वत मूल्ये बौद्ध धम्म हा जीवनमार्ग आहे , या अर्थाने अंगीकारणारा साहित्यिक म्हणजे आंबेडकरवादी साहित्यिक होय. त्यामुळे ज्या बाबासाहेबांना आमचे साहित्यिक आपल्या साहित्याचा प्रेरणास्त्रोत मानतात, त्या साहित्यिकांनी भारतीय संस्कृतीची शाश्वत मूल्य, बौद्ध धम्म हा जीवनमार्ग आहे, या अर्थाने अंगीकारली आहेत काय? बाबासाहेबांनी दाखवलेल्या या माणूस केंद्रित धम्म मार्गाला साजेशा अर्थात सामाजिक पुनर्बांधणीच्या कामी त्यांच्या साहित्यातिक अविष्काराचा काही उपयोग होतो आहे काय ? असे प्रश्न मला पडतात, असे सांगून आंबेडकरी साहित्य आणि साहित्यिक याविषयी सखोल भाष्य केले.

तर या संगीतीचे उद्घाटक ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, 1967 साली औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात तत्कालीन विद्वानांनी धर्मांतरित बौद्धांच्या साहित्याला काय संबोधावे? यावर चर्चेअंती दलित साहित्य संबोधावे असे ठरले. 1956 साली बौद्ध झालेल्या साहित्यिकांच्या साहित्याला 1967 साली दलित साहित्य म्हणावे असे ठरते, माझ्या दृष्टीने हे एक मोठे गटकारस्थान होते.

धर्मांतरितांना बौद्ध वाङ्मयातून, बौद्ध संस्कारातून, बौद्ध इतिहासातून दूर ठेवण्याचे आणि काही काळ या दुष्ट लोकांचे दुष्ट हेतू सफल झालेले दिसतात. कला ही कुणाची बटिक नसते आणि बटीक असते ती कला नसते. आज मराठी व भारतीय साहित्य कुणाची बटीक म्हणून कार्यरत आहे .? मराठी साहित्यात मनोरंजनाचे फड का बहरत असतात? मराठी साहित्य व्यक्ती विरुद्ध व्यक्ती या एकाच सूत्रात रचले जाते. त्यामुळे मराठी परंपरा सांगते 64 कला आणि या 64 कला मध्ये चोरी करणे यालाही कला मानले जाते. मराठी साहित्याच्या साडेसातशे वर्षाच्या काळात कला कशाला म्हणावे हेही ठरवता आले नाही. ज्ञानदर्शी वाङ्मयाने वाचणाऱ्याला ज्ञान दिले पाहिजे. जगणं सुखकर करण्याचे सर्व मार्ग उलगडून दाखवले पाहिजे. तथागत बुद्ध आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजचे पथदर्शक त्यांच्या तत्त्वचिंतनातून ते हेच तर सांगत आले आहेत. याचा बोध आपण घेतला पाहिजे, असे सांगितले.

प्रबोधिनीचे अध्यक्ष ज.वी. पवार यांनी महाडमध्ये होत असलेल्या या संगीतीची वैशिष्ट्ये नमूद केली, तसेच संस्थेची भूमिका मांडली. तर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद टिपणीस यांनी अपरांत भूमीविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती नमूद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अभिनेते अशोक चाफे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ. संजय खैरे यांनी पाहुण्यांचा परिचय तर ज वि पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधिनीचे सरचिटणीस संदेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन विश्वास पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार सूत्रसंचालन अभिनेते निलेश पवार यांनी केले.

त्याप्रसंगी तुळशीराम जाधव, दीपेश भाऊ जाधव , अरुणा येलवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ श्रीधर पवार, सुनील जाधव, अरुण कदम, अनिल जाधव, राष्ट्रपाल सावंत, संध्या तांबे, स्नेहा कदम, गीतांजली साळवी, सिध्दार्थ तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अपरांत संगीति विशेषांक 2025 अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच संदेश पवार यांचे ‘पुरोगामी महाराष्ट्राचे उजवीकडे वळण ‘, सुनील हेतकर यांचे परिव्रजा, जनिकुमार कांबळे यांचे गावू गाणी युगंधराची, अरुण नाईक यांचे बरड लागलेला दरवाजा , प्रा. डॉ. संजय खैरे यांचे स्पंदन या पुस्तकांचे प्रकाशन प्रेमानंद गज्वी, आनंद देवडेकर व ज. वी पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यामध्ये तरुण चित्रकार योगेश बर्वे, साव्या लोपेज, शाजन कविता, मित्रा स्वयंदीप, सृजना श्रीधर, बाओ यांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ही चित्र आहेत. तसेच भव्य पुस्तक प्रदर्शन देखील लावण्यात आलेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 20-01-2025