रत्नागिरी : एकीकडे गुटखा, पानसुपारी, तंबाखूजन्य पदार्थांना बंदी असताना त्याची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्री आणि सेवन होताना दिसत आहे. अब व औषध प्रशासनाच्या मर्यादामुळे हे प्रकार फोफावले आहे; परंतु दुसरीकडे एक समाधानकारक आणि आदर्शवत कामगिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाने केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय आवारात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळून आलेल्या ३९८ जणांवर कारवाई करून २४ हजार ४४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२४ मध्ये ही कारवाई केली आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तंबाखूच्या सेवनाने मौखिक कर्करोगाला आमंत्रण दिले जाते. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत गेल्या नऊ महिन्यांत जिल्हा शासकीय रुग्णालयात आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अशा ९ हजार ४८ जणांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे ३०८ जणांनी तंबाखूचे लागलेले व्यसन सोडले, हे या कार्यक्रमाचे फलित आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नोडल ऑफिसर डॉ. विकास कुमरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, सचिन भरणे आणि समुपदेशक प्राची भोसले समुपदेशन करतात. गेल्या नऊ महिन्यांत ३०८ जणांनी समुपदेशनामुळे तंबाखू सोडला आहे.
१०० शाळा तंबाखूमुक्त
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन, धूम्रपानास बंदी आहे. शाळा परिसरातील १०० मीटरच्या आत या पदार्थांच्या विक्रीलाही मनाई आहे. या वर्षात या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०० शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत.
तंबाखू, गुटखा या पदार्थाच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यापासून दूर राहावे. काही लक्षणे दिसू लागताच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी क्र. ९ मध्ये संपर्क करावा – डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 22/Jan/2025














