मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याचा इशारा दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज रत्नागिरी पासून याची सुरुवात होणार आहे. रत्नागिरी शहरातील विवेक हॉटेल च्या हॉल मध्ये प्रवेशाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात उबाठा चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उदय सामंत यांनी सांगितले की शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याचा पहिला टप्पा उद्या रत्नागिरीत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रत्नागिरीतील काही माजी आमदार ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यात यश मिळवल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की सलग तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात १५ लाख ७० हजार कोटी रुपयांचे एमओयू करण्यात यश मिळवले आहे. या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधताना सांगितले की काही नेते राजकीयदृष्ट्या बालिश झाले आहेत आणि ते स्वतःचा राजकीय उदय करण्यासाठी त्यांच्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना सांगितले की ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी त्यांच्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिदृश्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. उदय सामंत यांच्या दाव्यानुसार, या घडामोडींचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील पडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 24-01-2025














