मार्लेश्वरच्या यात्रौत्सवातून देवरूख आगाराला ५ लाख ३० हजारांचे उत्पन्न

देवरुख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वरच्या वार्षिक यात्रौत्सव काळात देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या यात्रौत्सवातून देवरूख आगाराला ५ लाख ३० हजार ३४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगारव्यवस्थापक सौ. रेश्मा मधाळे यांनी दिली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत, सभोवताली उंचच उंच ताशीव कडे, हिरव्यागार वनराईत, निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. हा धबधबा मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालत असतो तर गुहेमध्ये सापांचा वावर असतो मात्र आजपर्यंत एकाही भाविकाला सापाकडून इजा झाल्याचे ऐकिवात नाही. श्री देव मार्लेश्वराचे देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसले असल्याने दररोज हजारो भाविक मार्लेश्वरच्या दर्शनासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. तसेच येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही दाखल होत असतात. राज्य शासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे मार्लेश्वराच्या भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. जानेवारी महिना उजाडला कि मार्लेश्वरावर अगाध श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांना मकरसंक्रांतीच्या वार्षिक यात्रौत्सवाचे वेध लागतात. हा यात्रौत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.

यावर्षी हा यात्रौत्सव दि. ११ ते १७ या कालावधीत साजरा करण्यात आला. या यात्रौत्सवासाठी देवरुख आगाराने दरवर्षीप्रमाणे जादा बसेस सोडून भाविकांची सोय केली होती. दि. १३ ते १५ असे तीन दिवस देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. देवरुख ते मार्लेश्वर, साखरपा ते मार्लेश्वर, संगमेश्वर रेल्वेस्टेशन ते मार्लेश्वर, पायथा ते पार्किंग अशा जादा बसेस सोडण्यात आल्या. या जादा बसेसचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. आज जरी खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मोठ्या संख्येने भाविकांनी जादा बसेसचा लाभ घेत आजही एसटी महामंडळाच्या लालपरीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यात्रौत्सव काळात देवरूख आगाराच्या एकूण ५१३ इतक्या जादा बसेसच्या फेन्या झाल्या. ८ हजार ६६४ किमी इतके अंतर झाले. ३६ हजार ८८३ प्रवाशी भाविकांनी जादा बसेसचा लाभ घेतला. तर देवरूख आगारातील चालक, वाहक व तांत्रीक कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व आगाराच्या योग्य नियोजनामुळे या जादा बसेसमधून यात्रौत्सव काळात देवरूख आगाराला ५ लाख ३० हजार ३४४ रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाल्याचे देवरूख आगारव्यवस्थापक सौ. रेश्मा मधाळे यांनी आवर्जून सांगितले. तर या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 24/Jan/2025