रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात प्रशासनाने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही मच्छीमारांनी आज (२५ जानेवारी) स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पुढाकार घेतला.
मिरकरवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मत्स्य विभागाने नोटीस बजावली आहे. ही बांधकामे मच्छीमारांनी स्वतःहून हटवावीत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना येथील स्थानिकांनी आक्रमक होत विरोध केला होता. त्यामुळे ही सर्व अनधिकृत बांधकामे २६ जानेवारीपर्यंत स्वतःहून हटवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत मच्छीमारांनी बांधकामे हटवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत काही मच्छीमारांनी आज स्वतःहून बांधकामे हटवण्यास सुरुवात केली. यावेळी या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, मत्स्य व्यवसाय अधिकारी आनंद पालव आणि प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय नागनाथ भादुले उपस्थित होते.
काही मच्छीमारांनी बांधकामे हटविण्यास आपणहून पुढाकार घेतला असला तरीही अद्यापही काही मच्छीमार यासाठी विरोध करताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनामार्फत सोमवारी त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 25-01-2025














