खेड : उपजिल्हा रुग्णालय कळंबणीच्या अनास्थेविरोधात मनसेच्या उपोषणाला यश

खेड : उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे शासनाने करोडो रुपये खर्च करून इमारत, स्टाफ, औषधे, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत; परंतु या ठिकाणी इथल्या अनास्थेमुळे गरजवंत रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इथल्या सोयी सुविधाच्या दृष्टीने विविध मागण्यांसाठी खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय अखाडे यांनी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू केले होते; मात्र सर्व मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे ठाम आश्वासन कळंबणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरिब जनतेसाठी वरदान ठरत होते. शासनाने करोडो रुपये खर्च करून इमारत स्टाफ, औषधे, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत; परंतु इथल्या अनागोंदी कारभारामुळे गरजवंत रुग्णांना या सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध व्हावा, औषधसाठा वेळेवर उपलब्ध होत नाही बाहेरून मागवावी लागतात. त्यामुळे लागणारी सर्व औषधे उपलब्ध व्हावीत, एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन धुळखात पडल्या आहेत त्या त्वरित सुरू कराव्यात, ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, भूलतज्ञ उपलब्ध व्हावेत या मागण्यांसाठी खेड तहसीलदार कार्यालय येथे खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय अखाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते; मात्र कळंबणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी वरील सर्व मागण्या लवकरच पूर्ण करतो, असा ठाम विश्वास दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

पण जर वरील मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 28/Jan/2025