गुहागर : येथील पोलिस परेड मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभानंतर गुहागर तालुक्यातील ई-कचरा संकलन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, गटविकास अधिकारी केळस्कर, गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण आणि लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष अनिकेत गोळे आदींच्या हस्ते ई कचरा नगरपंचायतीच्या घंटागाडीत टाकण्यात आला.
सध्या शासनाद्वारे शहरी आणि ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. त्यातही ई-कचरा संकलनाचा विषय असल्याने गुहागरच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपंचायतीने या उपक्रमाला आणखी बळ दिले. या अभियानामध्ये नादुरुस्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. ज्यामध्ये जुने मोबाईल, टॅब, मोबाईल चार्जर, इयरफोन, पॉवरबँक, लॅपटॉप, कॉम्युटर (स्क्रीन, सीपीयु, किबोर्ड, माऊस, मदरबोर्ड, प्रिंटर, टोनर, स्कॅनर, केबल), सर्व प्रकारचे टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम, रेडिओ, कोविड काळात वापरलेले ऑक्समिटर, श्रवणयंत्रे, स्मार्ट वॉच आदी ई-कचरा शहरी आणि ग्रामीण भागातून संकलित करण्यात येणार आहे.
मयुरेश पाटणकर यांनी यावेळी अभियानाची माहिती उपस्थितांना दिली. गुहागर नगरपंचायत क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक रविवारी ई- कचरा संकलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमार्फत ई-कचरा संकलनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच गावागावांत संकलन केंद्र तयार केली जाणार आहेत. अभियानाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायत कर्मचारी, सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन गटविकास अधिकारी केळस्कर करीत आहेत. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांनी आपल्याकडील ई-कचरा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या संकलन अभियानात द्यावा, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 30/Jan/2025













