रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षांचा ३६० कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे. वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना जवळपास ५५ टक्के म्हणजे १९४ कोटी निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. १६६ कोटींच्या निधीची प्रतीक्षा आहे. नियोजनमध्ये मंजूर झालेली अनेक विकास कामे सुरू आहेत. परंतु, उर्वरित निधी न आल्यास निधीअभावी विकास कामेही ठप्प होण्याची भीती असून, ठेकेदारही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन मंडळाची आढावा बैठक २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामध्ये हा विषय चर्चेचा ठरणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा २०२४-२५ च्या ३६० कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. आराखड्यानुसार मंजूर झालेली कामे त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन सुरुवातही झाली. या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये १९४ कोटींचा निधी जिल्हा नियोजनला प्राप्त झाला होता. मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनची आढावा बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली आहे. या आढावा बैठकीत विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा होणार आहे.
मार्च अखेरीपर्यंत खर्चाची मुदत
जिल्ह्याच्या मंजूर ३६० कोटींच्या आराखड्यापैकी १९४ कोटींचाच निधी प्राप्त झाला असून, १६६ कोटींच्या निधीचा निधीची प्रतिक्षा आहे. मार्च अखेरीस हा निधी खर्च करायचा असून, या निधीमुळे रस्ते, साकवांची कामे रखडण्याची शक्यता आहे. नियोजनमधून अनेक विकास कामे झालेली आहेत. त्याचे पैसे मिळत नसल्याचे ठेकेदारही अडचणीत सापडले आहेत. लाडकी बहीण योजनेला मोठ्याप्रमाणात खर्च येत असल्याने, अन्य योजनांच्या निधीला कात्री लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 31/Jan/2025













