गांधी-नेहरुंच्या समृद्ध विचारांचा व राजकारणाचा वारसा आपण विसरलो : किशोर बेडकिहाळ

चिपळूण : येथील पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने ३० जानेवारी गांधी पुण्यतिथी दिनी दिवंगत साथी चंद्रकांत खातू स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीघाटावरील महात्मा गांधीजींच्या समाधी समोर हा कार्यक्रम झाला.

यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात गांधी अभ्यासक, पत्रकार किशोर बेडकिहाळ यांनी गांधी-नेहरूंचे देशाला योगदान या विषयावर व्याख्यान देताना गांधी-नेहरूंचा समृद्ध विचारांचा वारसा व राजकारणाचा वारसा आपण विसरलो, हेच आजच्या सामाजिक अनास्थेचे मूळ आहे, अशी खंत व्यक्त केली.

यावेळी संगमेश्वर, देवरुखपासून कार्यकर्ते बेडकिहाळ यांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. कार्यक्रमाची सुरवात चिपळूणच्या प्रसिद्ध गायिका उत्तरा साडविलकर यांच्या गायनाने झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी सर्वांचे स्वागत केले व खातू कुटुंबियानी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

यावेळी माजी आ. रमेश कदम, मुख्याधिकारी विशाल भोसले तसेच अनिल खातू व स्नेहलता खातू व देवरुखचे प्रा. डॉ. सुरेश जोशी उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत स्मरणिका व पुष्प देऊन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जाफर गोठे, सदस्य लियाकत शहा, दीपक महाडीक यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सचिव सुनील खेडेकर यांनी करून दिला.

बेडकिहाळ म्हणाले, गांधीजींनी भारतीयांची आत्मशक्ती जागी केली, त्यांना निर्भय बनविले व त्यांच्या हाती अन्यायाविरुद्ध लढण्याचे सत्याग्रहाचे हत्यार दिले. अहिंसेच्या मागनि स्वातंत्र्य मिळविता येते, हे त्यांनी दाखवून दिले आणि त्यापासून जगभराच्या देशभक्तांनी प्रेरणा घेतली. महात्मा गांधींचे कार्य, लक्षात घेऊनच त्यांची सहस्त्रकातील सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून जगाने त्यांची निवड केली.
पंडित नेहरुंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली. देशात लोकशाही संस्थांची स्थापना केली.

संविधान, संसद व विरोधी पक्ष यांचा सदैव आदर केला. नेहरूंसमोर प्रचंड आव्हाने होती. त्यांच्या विद्धत्तेचा, इंग्रजीचा अनेक परकीयांना हेवा वाटायचा. अशा गांधी-नेहरु यांचे कार्य सर्वांनी समजून घ्यावे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन बेडकिहाळ यांनी व्याख्यानाचा अखेरीस केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 03/Feb/2025