रत्नागिरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळात जिल्ह्यात ९४७ पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र यापैकी २०४ अर्ज अपात्र झाले आहेत. यामुळे ७४३ अर्जच वैध ठरले आहेत. मुदत वाढल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेमधून पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकारमार्फत शाळांना प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते. जिल्ह्यात यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ९१ शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्यास २७ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ती वाढवून २ फेब्रुवारीअखेर केली आहे. ९१ शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ९८२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २७ जानेवारीपर्यंत ९४७पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २०४ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. यामुळे सध्यातरी ७४३ अर्ज पात्र ठरले आहेत. आता मुदत वाढल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 03/Feb/2025














