हक्क व अधिकार मिळवण्यासाठी संघटीत व्हा : शंकर बाईत

खेड : हक्क व अधिकार हे मागून मिळत नाहीत तर त्यासाठी संघटितपणे लढा द्यावा लागतो. समाजाने संघटित राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेडचे अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले.

दिवा साउथ इंडियन इंग्लिश स्कूल येथे कुणबी समाजाच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघाचे संघ कार्यकारिणी सदस्य नवनीत पिंपरे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणचे सचिव सचिन गोवळकर, सुधीर वैराग, पांडुरंग पाष्टे, मुंबई शाखा खेडचे सुरेश मांडवकर, संदीप दोडेकर, रूपेश तांबट, संजय जाधव आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बाईत म्हणाले, कुणबी समाज हा बहुसंख्येने आहे. तो विखुरलेला असल्याने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होते. या स्नेहमेळावाच्या माध्यमातून विखुरलेल्या बांधवांनी संघटित होऊन एकत्र आले पाहिजे. समाजबांधवांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. त्यामध्ये एकमेकांची सुखःदुख समजतात. यामधूनच समाजातील प्रश्नांवर विचारविनिमय होतो. कुणबी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या त्या कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी सचिन गोवळकर म्हणाले, पती नसलेल्या स्त्रियांना हळदीकुंकू कार्यक्रमासह इतर सर्वच धार्मिक कार्यक्रमात डावलले जाते. पती मयत होणे यामध्ये स्त्रीचा काहीच दोष नाही. अशा स्त्रियांना समाजाची खरी गरज आहे. त्या स्त्रियांना सन्मानपूर्वक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्या. खरंतर, जास्तीत जास्त भावनिक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना केली पाहिजे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेव्हा अपमानीत न करता सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 04/Feb/2025