देवरुख येथील आजी-आजोबांचे स्नेहसंमेलन

संगमेश्वर : एरवी नातवंडांच्या स्नेहसंमेलनाची आवडीने आणि हौसेने तयारी करून देणाऱ्या देवरूख येथील आजी आजोबांनी स्वतःच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी घेण्यासाठी आपलेच स्नेहसंमेलन साजरे केले. त्यांच्या स्नेहसंमेलनाच हे २२वे वर्ष आहे.

तालुक्यातील देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या १९६३ सालच्या बॅचचे स्नेहसंमेलन हा दिवसेंदिवस कौतुकाचा विषय होत चालला आहे. ऐंशीच्या घरात पोहचलेले हे देवरूख शाळेचे विद्यार्थी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी दरवर्षी एकत्र येत आहेत. सर्वसाधारणपणे ज्या वयात माणसे काठी टेकत डॉक्टरांच्या वाऱ्या करतात, त्या वयात हे लोक मात्र कोणतीही अडचण येवो, सलग २२ वर्षे भेटत आहेत हीच मोठी कौतुकाची बाब आहे.

शाळेतील मित्रमैत्रिणींना लक्षात ठेवून त्यांच्यासोबत तीन-चार दिवस घालवणे हीच यांच्या आरोग्याची आणि आनंदी असण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हणावे लागेल. वर्षातले तीन-चार दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवत हे लोक एकत्र जमतात आणि एकमेकांची ख्यालीखुशाली, सुख-दुःख वाटून घेत आनंदात दिवस घालवतात.

यावर्षी पुण्यातील भूगाव येथील निसर्ग छाया या रिसॉर्टवर हे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या तीन दिवसांत सर्व आजी आजोबांनी आपले वय विसरून गप्पा गोष्टी, खेळ, चर्चा करत येथील आतिथ्याचा अनुभव घेतला. या वयातही आपले बालपण अनुभवले. तीन दिवस भरपूर धम्माल केली. अशीच अनेक स्नेहसंमेलने उत्साहात होण्यासाठी सर्वांना उत्साह, निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होण्याची इच्छा व्यक्त करून या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 06-02-2025