आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक – शरद गोसावी

रत्नागिरी : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१)(सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/ प्रशासन अधिकारी मनपा/नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांच्याकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी.

तथापि, असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 06/Feb/2025