गुहागर : तालुक्यात युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहा महिन्यांपूर्वी नेमण्यात आले. त्याच्या सेवेचा कालावधी फेब्रुवारी अखेर संपुष्टात येणार असून, त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थीनी गुहागर तहसीलदारांना दिले.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून युवक व युवतींना शासकीय कार्यालयात रोजगारासह मानधन देण्याची सुविधा उपलब्ध केली. यामुळे बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय कार्यालयात प्रशिक्षणासह दरमहा मानधनाची सोय करण्यात आली आहे.
दरमहा डीबीटी पद्धतीने प्रशिक्षणार्थीच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा करण्यात येत आहे; परंतु आता फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपत असल्याने आता ६ महिन्यानंतर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. युवा प्रशिक्षणार्थीना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेऊन युवा प्रशिक्षणार्थीची पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 07/Feb/2025
