डॉ. शैलेश शिंदे-देसाई यांना कृषी भूषण पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : ओणी (ता. राजापूर) येथील सावली कृषी पर्यटन केंद्राचे संचालक डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदे-देसाई यांना शेती प्रगती मासिकाचा कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कृषीविषयक शेतीप्रगती मासिक आणि ध्यास शाश्वत शेती विकास ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतीप्रगती मासिकाचा वर्धापन दिन कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. शिंदे-देसाई यांना गौरविण्यात आले.

डॉ. शिंदे-देसाई यांनी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळविली असून त्यांनी कृषीउद्यमशीलतेवर लिहिलेले पुस्तक जर्मनीत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कृषीविषयक अनेक शोधनिबंध देश-विदेशात प्रसिद्ध झाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चार सेमिनारमध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांचा समावेश आहे. याशिवाय अनेक चर्चासत्रे आणि कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध स्तरावर ३०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली असून काजू आणि काजूप्रक्रिया उद्योगाबाबत त्यांचे अनेक लेख आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ओणी येथे त्यांनी सावली कृषी पर्यटन केंद्र, श्री अॅग्रो सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी, श्री काजू प्रक्रिया उद्योग, श्री नर्सरी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सरसेनापती मल्हारराव होळकर बंदिस्त शेळीपालन, गीर पालन इत्यादी उपक्रम सुरू केले आहेत. आंबा, काजू आणि बांबूची लागवड ही त्यांनी सुमारे १७ एकर क्षेत्रात केली आहे. त्यामार्फत त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील युवक, शेतकरी तसेच महिला बचत गटांना ते सतत मार्गदर्शन करत असतात.

त्यांच्या शेती क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीच्या शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि व्याख्याते इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी कृषी संचालक विकास पाटील, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. वसंतराव जुगळे, शेतीप्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 07-02-2025