खेड : थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून पथके तैनात

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

खेड : उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांत महावितरणची १ कोटी ७७ लाख रुपयांची वीज बिले थकली आहेत. ही थकित वीजबिले वसूल करण्यासाठी तीनही तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत थकीत देयके वसूल करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. वीजबिले भरणा करण्यास कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी दिली.

घरगुती, औद्योगिक, व्यापारी व इतर संवर्गातील १ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये दापोली उपविभाग १ मध्ये ४२ लाख तर २ मध्ये ३६ लाख, खेड उपविभागात ४२ लाख, लोटे उपविभागात २८ लाख तर मंडणगड उपविभागात २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकित रक्क्म वसुलीसाठी तीनही तालुक्यात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तीनही तालुक्यातील शासकीय कार्यालयांची २ कोटीहून अधिक रुपयांची बिले थकली आहेत. शासकीय कार्यालये मार्च अखेरीसपर्यंत वीजबिले भरणा करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देत असतात. यामुळे शासकीय कार्यालयातील थकबाकी मार्च अखेरीसपर्यंत पूर्णपणे वसूल करण्यास यश येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. ज्या ग्राहकांची वीजबिले थकली आहेत. त्या ग्राहकांनी तातडीने वीजबिले भरणा करून कारवाई टाळण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावे, असे आवाहनही महावितरण प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 08/Feb/2025