रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ बालके तीव्र कुपोषित

रत्नागिरी : कुपोषित बालकांच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाकडून योजना राबवण्यात येतात; मात्र जनजागृतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण खूपच कमी आहे. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५८५ कुपोषित बालके असून, ४८ तीव्र कुपोषित बालके आहेत.

या मुलांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. कमी कुपोषित बालकांच्या यादीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे वयोगटांतील ५३ हजार २६६ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५३७ बालके मध्यम, तीव्र कुपोषित (मॅम) आढळली असून, त्यातील ४८ बालके तीव्र कुपोषित (सॅम) आहेत. या तपासणीत कमी वजनाची ६५१ बालके आढळली आहेत.

अतिकुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करून सकस आहार दिला जात आहे.

महिला व बालकल्याण अधिकारी एस. डी. हावळे हे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. या बालकांचा ते वेळोवेळी आढावा घेत आहेत आणि संबंधितांना पूरक सूचनाही देत आहेत.

सर्वात कमी कुपोषित बालकांच्या यादीत रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी कुपोषित बालके आहेत. जिल्ह्यात वजन घेतलेली बालके ५३ हजार २६६ आहेत. त्यामध्ये तीव्र कुपोषित बालके ४८, तर तीव्र मध्यम कुपोषित ५३७ बालकांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 08-02-2025