गुहागर : निसर्ग संरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून काम करत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगलभ्रमंती दरम्यान गुहागर तालूक्यातील रानवी येथील कातळसडयावर एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहा कातळशिल्प प्रतिकृतींच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. एका भागात, दोन ठिकाणा प्रत्येकी तीन, त्याही वेगवेगळया रूपात सापडलेल्या तब्बल सहा प्रतिकृतींमुळे कातळशिल्प संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. सध्या संस्थेसह पुणेतील अभ्यासकांच्या माध्यमातून या कातळशिल्पांच्या अभ्यास सुरू आहे.
अवघ्या महाराष्ट्रात निसर्ग संरक्षण, पर्यावरण, वन्यजीवरक्षण, वणवामुक्ती, जंगल पर्यटन याशिवाय आदिवासी पाडयांच्या अडाणीत धावणाऱ्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या सदफ कडवेकर, राणी प्रभुलकर आणि शुभम कुरधुंडकर यांचे काम मोठे आहे. गेल्या अनेक वर्षापासून सहयाद्रीच्या खोऱ्यात ते निसर्ग संरक्षण आणि वन्यजीवांसाठी काम करत आहेत. जंगल भटकंती करत असताना रानवी येथील जंगलात मधोमध असलेल्या कातळावर ही शिल्पे आढळून आली आहेत.
रानवी गावाला विस्तीर्ण कातळसडा तसेच देखणी किनारपट्टी लाभली आहे. पावसाळ्यात खुलून येणारे, जैवविविधतेने नटणारे हे माळरान फार लक्षवेधी असते. तेच माळरान पावसाळ्यानंतर मात्र उजाड दिसू लागते. पण अशाच या उजाड आणि निरुपयोगी वाटणाऱ्या माळरानाने अशा प्रकारचा अनोखा ऐतिहासिक वारसा आपल्या कुशीत जपलेला आढळून आला आहे. कोकणातील ही कातळ कोरीव शिल्पे स्वतच्या अस्तित्वाच्या खुणांसोबत बरेचसे प्रश्न उपस्थित करत असल्याने त्याकडे अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे.
कातळशिल्पांमध्ये कोकणातील पठारी जैवविविधता तसेच समुद्रीजीवन आणि याव्यतिरिक्त हत्ती, गेंडा यांसारख्या महाकाय प्राण्यांचे आकार आढळलेले आहेत. तसेच त्यावेळच्या प्रवासादरम्यानच्या घटना या शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रतिकृतांया आकारांचे अर्थ अद्यापही उलगडलेले नाहीत. रानवी येथेही चारही बाजूने जंगल आणि मधोमध असलेल्या कातळसडयावर दोन ठिकाणी प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा शिल्प आढळून आली. त्यामध्ये दोन शिल्प प्रतिकृती या मानवी आकाराया असून अन्य चार प्रतिकृतींचे अर्थ उलगडताना दिसत नाहीत. त्यासाठी सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या माध्यमातून त्याबरोबर पुणे येथील कातळशिल्प अभ्यासक मिलिंद वाटवे यांच्या माध्यमातूनही अभ्यास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 08-02-2025
