रत्नागिरी : राजन साळवी येत्या १० तारखेला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. १० तारखेला ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक ठाणे येथे जाऊन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आता मिळत आहे. मात्र यामागे शिंदे गटाचे कोकणातील सर्वेसर्वा, मंत्री उदय सामंत यांच्याकडून अजूनही हिरवा कंदील मिळत नसल्याचे देखील बोलले जात आहे. राजन साळवी यांनी आपल्या काही जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्याला शिंदे गटात प्रवेश करायचा आहे असा मेसेज देखील दिल्याची माहिती मिळत आहे.
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरेंच्या सेनेत नाराज होते. तशी नाराजी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून देखील दाखवली होती. माजी खासदार विनायक राऊत आणि राजन साळवी यांचे पक्षात देखील तसे सख्य नव्हते. राजन साळवी यांना भाजप ने ना घर का ना घाट का केल्याचे खळबळजनक वक्तव्य देखील विनायक राउत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांच्या तक्रारीला देखील सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याच काळात ते भाजप मध्ये जाणार असल्याची देखील चर्चा होती मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हि शक्यता देखील फेटाळून लावली होती. याच दरम्यान आता नवीन माहिती समोर येत असून यानुसार येत्या दोनच दिवसात म्हणजे १० तारखेला माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 08-02-2025
