राजापूर : सुकी काजू बी १६० रुपये किलो

राजापूर : प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट धुके आणि गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये झालेली कमालीची वाढ आदी विविध कारणांमुळे काजूच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच सुक्या काजूचा प्रतिकिलो दर १६० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून काजू उत्पादनाला प्रतिकूल वातावरण आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वादळी वारा, धुके यामुळे काजूचा मोहोर काळवंडून गेला होता. त्यामुळे काजूच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचाही फटका उत्पादनाला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले; मात्र हंगामाच्या सुरवातीलाच सुक्या काजू बी ला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून १२० ते १२५ रुपये किलोचा दर होता, त्यामध्ये काजू बी चा आकार लहान असल्यास तो ११० रुपये मिळत होता; मात्र यावर्षी हंगामाच्या सुरवातीला १६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. भविष्यामध्ये या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतिकूल वातावरण, धुक्यामुळे काजू उत्पादन यावर्षी कमी आहे. वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. अशा स्थितीमध्ये काजू बी खरेदीला चांगला दर मिळण्याची आशा होती. त्याप्रमाणे दर चांगला मिळाला आहे. त्यामुळे हंगामामध्ये मशागत आणि फवारणीसह अन्य कामांवर केलेला खर्च भागेल, अशी आशा आहे- गणेश शिंदे, बागायतदार, राजापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 08/Feb/2025