राजापूर : चिंचबांध येथील सूर्यमंदिर जीर्णावस्थेत

राजापूर : शहरातील चिंचबांध येथे असणारे पुरातन सूर्य मंदिर सध्या जीर्णावस्थेत असून, या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी राजापूरवासियांमधून करण्यात येत आहे.

राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या काठावर चिंचबांध येथे असणारे पुरातन सूर्य मंदिर हे सातवाहन राजा गंडरादित्याने बांधले असल्याचे मानले जाते. याच सातवाहन राजा गंडरादित्याने राजापूरच्या प्रसिद्ध गंगेवरील कुंडांचा जीर्णोद्धार केला असल्याचा ल्लेख इतिहासात मिळतात. गंगेवरील कुंड ज्या काळ्या दगडात बांधली गेली आहेत, तशाच प्रकारच्या काळ्या दगडात सुंदर रेखीव काम करून हे छोटेखानी मंदीर बांधले आहे.

इतिहासकाळात राजापूर हे जगाशी व्यापार करणारे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. या बंदरातून जगाच्या कानाकोपऱ्यात व्यापार चालत असे. शिवकाळात या राजापूर बंदराला दख्खनचे श्रीमंत प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात. या राजापूर बंदारातून मसाल्याचे पदार्थ, हळद, खोबरे व पंचे म्हणजे वस्त्र सातासमुद्रापार पाठवली जायची.

इंग्रज काळात राजापुरी पंचे, राजापुरी हळद, राजापुरी खोबरे या गोष्टी खुप प्रसिद्ध होत्या. या बंदरातून मोठ्या प्रमाणात मिठाचा व्यापारही चालत असे. त्याकाळी प्रसिद्ध असणाऱ्या राज देवी, विठ्ठल मंदिर व सूर्यमंदीर या प्रसिद्ध असणाऱ्या तीन मंदिरांपैकीच हे सूर्यमंदीर असल्याचे अनेक जाणकार सांगतात. त्यामुळे या मंदिराचे शासन स्तरावरुन जतन व संवर्धन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Radhakrushna patapedhi

मंदिराचा जीर्णोद्धार करावा
काही वर्षांपूर्वी राजापूर शहरातील काही नागरिकांनी या मंदिराची साफसफाई केली होती. सद्यस्थितीत या मंदिरावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असल्याने व ते आता पडण्याच्या स्थितीत असल्याने शासनाने या मंदिराचा जीर्णाद्धार करावा व त्या मंदिराचे संवर्धन करून पुरातन वास्तू म्हणून जतन करावे, अशी मागणी राजापूरवासियांधून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 10/Feb/2025