चिपळूण नगरपरिषदेची प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चिपळूण : शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा चिपळूण शहरात राजरोसपणे वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याविरोधात चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने तीव्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या आठ दिवसांत केलेल्या कारवाईतून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर दंड भरण्यास नकार देणाऱ्या एका विक्रेत्याची हातगाडी जप्त करण्यात आली आहे.

शासनाने प्लास्टिकच्या पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, तरीही काही व्यावसायिक बाजारपेठेसह शहर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. याबाबत माहिती मिळताच नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते हे अधूनमधून कारवाई करीत आहेत. तरीही व्यावसायिक प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याने आठवडाभरापासून सलग कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही व्यावसायिकांकडून सुमारे १५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मंगळवारी बाजारपेठेत कारवाई करताना एका लसूण विक्रेत्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या. मात्र, तरीही तो दंड भरण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याची हातगाडी थेट नगर पालिकेत आणण्यात आली. या कारवाईमुळे चिपळूण शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 10/Feb/2025