बुडणाऱ्यांना मिळणार तात्काळ जीवनदान; गणपतीपुळे, दापोली, गुहागर, आरे-वारे किनाऱ्यांवर अत्याधुनिक रोबोट तैनात
Life Saving Robotic Water Crafts च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे व आधुनिक पाऊल उचलले आहे. समुद्रातील बुडणाऱ्यांना तात्काळ जीवनदान मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून खरेदी करण्यात आलेले ५ अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी अधिकृतपणे जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटकांची मांदियाळी असते. मात्र, समुद्राचा अंदाज न येणे, भरती-ओहोटीच्या वेळांची माहिती नसणे किंवा पाण्याचा तीव्र प्रवाह यामुळे मागील पाच वर्षांत तब्बल १४३ निष्पाप पर्यटक व नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन भविष्यातील अमूल्य मानवी जीव वाचवण्यासाठी तातडीचे बचावकार्य करता यावे, या उद्देशाने या ‘लाईफ सेव्हिंग’ रोबोटिक वॉटर क्राफ्ट्सचा समावेश सुरक्षायंत्रणेत करण्यात आला आहे.
हे अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या आणि संवेदनशील किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गणपतीपुळे, दापोली (मुरुड-लाडघर पट्टा), गुहागर, आरे-वारे आणि इतर महत्त्वाच्या किनाऱ्यांचा समावेश आहे.
समुद्रात संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत प्रतिकूल हवामानातही हे रोबोट्स अत्यंत वेगाने पोहोचू शकतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाची आणि पोलीस दलाची बचावकार्यातील कार्यक्षमता दुपटीने वाढणार असून पर्यटकांच्या सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे.
या हस्तांतरण सोहळ्याप्रसंगी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 09-10-2026














