Damle Vidyalaya Ratnagiri: रत्नागिरीतील दामले विद्यालयाचा शिक्षणमंत्र्यांकडून गौरव; गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार

‘चला शाळेत जाऊया’ मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची शाळांना भेट; पानवल आणि झरेवाडी जि. प. शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची केली पाहणी

Damle Vidyalaya Ratnagiri येथील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेची उत्तुंग प्रगती पाहून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दामले विद्यालयाचे कौतुक करत गौरव केला आहे. रत्नागिरीच्या दौऱ्यावर आलेल्या शिक्षणमंत्र्यांनी ‘चला शाळेत जाऊया’ या विशेष उपक्रमांतर्गत दामले विद्यालयासह पानवल होरंबेवाडी आणि झरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना गुरुवारी (८ ऑक्टोबर) प्रत्यक्ष भेट दिली.

दामले विद्यालयास भेट दिल्यानंतर बोलताना शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, दामले विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गुणवत्तावाढीच्या क्षेत्रात मिळविलेले यश थक्क करणारे आहे. ही उत्तुंग प्रगती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रत्यक्ष अनुभवणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पाहणीदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या दौऱ्यामध्ये शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर चमकलेल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच उत्कृष्ट अध्यापनासाठी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भरवलेल्या कला व कार्यानुभव प्रदर्शनाची मंत्र्यांनी पाहणी करून बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेला दाद दिली. तसेच राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण विभागाच्या स्पर्धेत विभागीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मूल्यशिक्षणावर आधारित नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी शाळेचा वाढता पट आणि उपक्रमांची माहिती पीपीटीद्वारे सादर केली.

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात शिक्षणमंत्र्यांनी पानवल होरंबेवाडी आणि झरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा स्वतः अनुभवला.

Shiva optical

या प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिक्षण विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 09-10-2026