चिपळूण : डेरवण यूथ गेम्सचे १० मार्चपासून आयोजन

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अकराव्या डेरवण युथ गेम्सचे ता. १० ते १६ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.

या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब या खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १ हजार २०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रुपाने देण्यात येणार आहे.

अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धे निमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. १० मार्च रोजी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, ओलिंपियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत ८ ते १८ वर्षांखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. दि. ८ मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacad emy.com या वेबसाईटवर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 11/Feb/2025