भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी जाहीर; कोकणातील तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी जाहीर; कोकणातील तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडून कार्यकारिणी जाहीर; रत्नागिरीतील विक्रम जैन यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) महाराष्ट्र प्रदेशच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी मा. सुनील राणे तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांनी या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातील विविध विभागांतील सक्रिय व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून कोकणातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांना महत्त्वाची पदे मिळाली आहेत.

रत्नागिरीतील विक्रम जैन यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी :

जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, ४ महामंत्री, १० सचिव यांच्यासह विविध प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीचे विक्रम जैन (वय ३४) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोकण विभागातून सिंधुदुर्ग-देवगडचे श्रेयस शाहकर यांचीही प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. याशिवाय पुणे, कल्याण, बुलढाणा, छ. संभाजीनगर, लातूर, वाशिम आणि वर्धा येथील कार्यकर्त्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Khabardar diwali fest

रत्नागिरीतील अद्वैत कुलकर्णी आणि ॲड. मिलिंद नांदगावकर यांची सचिवपदी निवड :

भाजयुमो प्रदेश सचिवपदी एकूण १० जणांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला विशेष स्थान मिळाले आहे. रत्नागिरीचे अद्वैत कुलकर्णी (वय २९) आणि ॲड. मिलिंद नांदगावकर (वय ३५) यांची भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. याशिवाय सातारा, नागपूर शहर, जळगाव, जालना, इगतपुरी, कोल्हापूर, मुंबई आणि यवतमाळ येथील युवकांना सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

महामंत्री, कोषाध्यक्ष व इतर प्रमुख पदांची घोषणा :

प्रदेश महामंत्रीपदी बादल राऊत (नागपूर), सुदर्शन यादव (सोलापूर), तेजस्विनी दुर्गे (पिंपरी चिंचवड) आणि दत्तप्रसाद जाधव (बीड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विरेंद्र ठाकूर (मुंबई) यांची कोषाध्यक्षपदी आणि यश सातपुते (नागपूर) यांची सहकोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. यासोबतच यश तायडे (कार्यालय प्रमुख), प्रदीप सकपाळ (सोशल मीडिया प्रमुख) आणि शंभवी साळे (युवती प्रमुख) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणातील कार्यकर्त्यांना मिळालेल्या या महत्त्वाच्या संधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.