रत्नागिरी : ५०१ कंत्राटी शिक्षकांच्या नेमणूका रद्द होण्याची शक्यता?-

रत्नागिरी : सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड्, बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासननिर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे भरती केलेल्या ५०१ कंत्राटी शिक्षकांची नेमणूक रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील १२० कंत्राटी शिक्षकांचा समावेश आहे तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकभरती सुरू होत असल्यामुळे नियमित शिक्षक मिळण्याची शक्यता आहे.

सरकारी शाळेत १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या होती, तिथे बीएड आणि डीएड्द्धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास सरकारने मान्यता दिली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये हा शासननिर्णय काढण्यात आला होता.

नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून हा शासननिर्णय जाहीर केला होता; मात्र आता २०२२च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे २०२४ च्या शासननिर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल, असा नवा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ५०१ शाळांवर कंत्राटी शिक्षक नियुक्त केलेले आहेत. चिपळूण तालुक्यात एकूण ३१६ शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १२० शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद शाळांना लवकरच कायमस्वरूपी शिक्षक मिळणार आहेत; मात्र कंत्राटी पद्धतीने भरलेल्या शिक्षकांना थांबवण्याबाबत अजून आदेश आलेले नाहीत. सरकारचा आदेश आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. –दादासाहेब इरनाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 12/Feb/2025