चिपळूण : पूरमुक्तीच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने जम्बो प्रस्ताव तयार केला आहे. चिपळूण-कोळकेवाडीतून येणारे पाणी २ बोगदे काढून ते शहराबाहेर सोडणे, वाशिष्ठी नदीतील ९० लाख क्युबिक मीटर गाळ काढणे, नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे, २ बेट काढणे, आदी कामांचा समावेश या प्रस्तावात आहे. नुकताच तो शासनाला सादर केला असून, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
चिपळूण शहर वाशिष्ठी नदीच्या तीरावर असून, या नदीस येऊन मिळणाऱ्या जगबुडी, शिव आणि वैतरणा या नद्यांच्या दिशेनेदेखील शहराचा विस्तार होत आहे. सागरी किनाऱ्यालगतचे शहर असल्याने येथील पर्जन्यमान सुमारे ३५०० ते ४००० मि.मी. आहे. त्यामुळे पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टी व नद्यांना पूर येणे ही बाब शहरास सामान्य होती. गेल्या ६५ वर्षांमधील पुराच्या उपलब्ध नोंदी पाहता १९६५, २००५, २०२१ मध्ये महापूर आले. १९७२, १९७५, १९८९, १९९३, २०१९ मध्ये मध्यम तीव्रतेचे पूर येऊन गेले आहेत. २००५ व विशेषतः २०२१ मध्ये चिपळूण शहरामध्ये आलेला पूर हा जास्त विध्वंसक ठरला. यामध्ये जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांमध्ये सुमारे १९ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यानंतर पूररेषा निश्चित केल्याने बांधकामाबाबत अनेक निर्बंध लागू झाले आहेत. गाळ काढल्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये पूर आलेला नाही. त्यामुळे पूररेषा बदलण्याबाबतही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, चिपळूण पूरमुक्त करण्याच्यादृष्टीने पाटबंधारे विभागाने जम्बो प्रस्ताव तयार केला आहे. कोळकेवाडीतून पावसामध्ये मोठ्या प्रमाणात चिपळूण शहरात पाणी शिरते. त्यामुळे पुराच्या पाण्यात भर पडते. कोळकेवाडीचे हे पाणी चिपळूण शहराबाहेर सोडण्यासाठी या प्रस्तावामध्ये २ बोगदे (टनेल) प्रस्तावित आहेत. शहराबाहेर हे पाणी सोडले गेले तर पूरस्थिती नियंत्रणात राहणार आहे.
नदीतील सुमारे ९० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार आहे. नदीमध्ये जी दोन बेटे आहेत ती काढण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्रात जास्त पाणी सामावेल. किनाऱ्याची धूप होऊन पात्र वाढत आहे. त्यामुळे किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बाधण्यात येणार आहे. अशा प्रकारे अनेक उपाययोजनांचा प्रस्तावात समावेश आहे. त्याचे प्रेझेंटेशन करून शासनाला सादर केला आहे.
काय फायदे होणार ?
चिपळूण पूरमुक्तीच्या २२०० कोटीच्या प्रस्तावातील उपाययोजना केल्यानंतर त्याचे काय फायदे होणार, यावरही अभ्यास केला जाणार आहे. पाटबंधारे विभागाने त्यासाठी मुंबईच्या एफएम कंपनीला कन्सल्टन्ट कंपनी नेमली आहे.
प्रस्तावाबात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोकणातील शिष्टमंडळाला भेटलो. उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि मी होतो. या प्रस्तावाबाबत चर्चा करून निधीबाबत चर्चा केली. केंद्राकडूनही यासाठी निधी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. – शेखर निकम, आमदार, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 12/Feb/2025














