खेड : आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांनी शिव स्वराज्य सुरक्षा आणि मेन पॉवर या सुरक्षा कंपनीच्या सहकार्यातून शहरातील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या पाच दिवसीय सुरक्षा रक्षक भरती कार्यक्रमाचे उद्घाटन १५ रोजी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, मिनार चिखले, प्रेमल चिखले आदींच्या उपस्थितीत झाले. हे शिविर १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.
यावेळी शिव स्वराज सिक्युरिटी अँड मेन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कार्यक्रम अधिकारी गोरख जगताप व चंद्र शेखर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कंपनी मार्फत हा कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक भरती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पात्र युवकास सुरक्षा सुपरवायजर व सुरक्षा रक्षक म्हणून निवडले जाणार आहे. सुरक्षा रक्षक बनण्यासाठी १९ ते ४० वय, दहावी किंवा बारावी पास, १६५ सेंटिमीटर उंची, ५० किलो पेक्षा अधिक वजन, ८० सेंटिमीटर छाती असणे आवश्यक आहे. तसेच सुपरवायजर पदासाठी वय २४ ते ४० वर्षे, पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण, ५० किलो पेक्षा जास्त वजन, १७० सेंटिमीटर उंची व ८० सेंटिमीटर छाती आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी स्थळी नियुक्ती मिळण्यासाठी कंपनीच्या विभागीय प्रशिक्षण अकादमी पुणे द्वारे २१ दिवसांचे प्रशिक्षण शुल्क भरून पूर्ण करणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांनी त्यामध्ये सहभागी होऊन बुट बेल्ट, टोपी, गणवेश, टी-शर्ट, खाकी, हाफ पैंट, डीजी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र, या सर्व सुविधांसह, कंपनी मार्फत सशुल्क जवानांना दिले जाणार आहे.
एकवीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाविसाव्या दिवशी सर्व जवानांना नोकरी तीन महिन्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि विभागांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना पीएफ, पेन्शन सारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून मिळणार आहेत. विधवा निवृत्ती वेतन, ३ लाख रुपयांचा विमा यांसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. तर सुरक्षा रक्षक म्हणून १५ ते १९ हजार तर सुपरवायजर म्हणून १६ ते २३ हजार रुपये दर महा वेतन नियुक्तीपासून मिळवता येणार आहे.
खेडमध्ये पहिल्याच दिवशी १५ रोजी एकूण ६० मुले भरती शिबिरासाठी आली होती ज्यामध्ये ५३ मुलांची २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते यांकडून निवड पत्र देण्यात आले. यावेळी खेड, दापोली व मंडणगडमधील बेरोजगार पात्र युवकांनी या भरती शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंदन सातपुते यांनी केले.