चिपळूण : घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. ७ रोजी मण्यार या अत्यंत विषारी सापाने त्याच्या मानेला दंश केला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही थांबला आणि त्यांचा हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली. बाळाला तातडीने भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्या चिमुकल्यावर यशस्वी उपचार झाले व बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.
बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कृत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला. पनवेल हून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ. अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. असे अनेक दिवसांपासून मुलाची प्रकृती गंभीर होत होती.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आणि आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला.
रुग्णालयातील बालरोग विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला. या बद्दल बाळाच्या आईवडिलांनी डेरवण रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 03/Oct/2024