लांजा : गोळवशी शाळा नं. २ भरते ग्रामस्थांच्या घरात

लांजा : गतवर्षी छप्पर दुरुस्तीच्या कारणास्तव जुन २०२४ पासून ग्रामस्थांच्या घरात भरणारी गोळवशी शाळा नं. २ ही आजही घरातच भरत आहे.

शिक्षण विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ येवून ठेपलेली आहे. अशा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा विडा शिक्षण विभागाने घेतला आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या गोळवशी गावातील जि.प.शाळा नंबर २ नादूरुस्त झाली आहे. संपूर्ण इमारत नव्याने बांधणे गरजेचे आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने किमान या शाळेचे छप्पर तरी बांधून द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी गतवर्षी म्हणजे २०२४ मध्ये केली होती. त्यानंतर या शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा निधी मंजूरही झाला होता. तर छप्पर दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी मार्च २०२४ मध्ये श्रमदान करून छप्परावरील कौले, वासे व अन्य साहित्य बाजूला काढून ठेवले होते. जेणेकरून काम लवकर लवकर पूर्ण होईल आणि नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शाळेत बसु शकतील अशी पालकांची अपेक्षा होती. तसे आश्वासन देखील छप्पर दुरूस्त करणाऱ्या ठेकेदाराने ग्रामस्थांना दिले होते.

मात्र त्यानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही ठेकेदारांकडून शाळेचे छप्पर दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने आणि शाळा इमारतीवर छप्पर नसल्याने नाईलाजाने ही शाळा एका ग्रामस्थांच्या घरात भरविण्याची वेळ येवून ठेपली होती. त्यानंतर आजतागायत विद्यार्थी दुसऱ्याच्या घरी बसून शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

याबाबत ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी यांना देखील भेट घेऊन निवेद दिले होते. मात्र तरी देखील शाळा नंबर दोन च्या छप्पर दुरुस्ती कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष बाब म्हणजे लांजा गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेचा प्रस्ताव हा आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजे जि.प. शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. मात्र त्यांच्याकडून शाळा दुरूस्ती किंवा नवीन इमारत बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने सलग दुसऱ्या वर्षीही गोळवशी शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांवर घरात बसून अध्यापन करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे शिक्षण विभाग शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र गोळवशी सारख्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा विडा शिक्षण विभागाने घेतला आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थ, पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने त्वरीत नवीन शाळा इमारतीचे काम हाती घ्यावे. पावसाळ्यापूर्वी यादृष्टीने कार्यवाही झाली नाही तर नाईलाजाने शाळा बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

त्यामुळे आता शिक्षण विभाग यादृष्टीने खरोखरच पाऊले उचलणार का? की ये रे माझ्या मागल्या प्रमाणे चालढकल करणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:38 PM 14/Feb/2025