पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे येथील विद्यार्थी ई-लर्निंग अध्ययन केंद्राचे उद्घाटन तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी यांच्या हस्ते व एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक संतोष कोलते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तळवडे ग्रामपंचायतीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ई-लर्निंग अध्ययन केंद्रासाठी लागणारे पाच संगणक तळवडे गावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक संजय कोकरे यांनी दिले. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्यामागे संजय कोकरे यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावीपासून मुलांना कोडींगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आपली मुले यात पारगंत व्हावीत यासाठी पहिलीपासून पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमासोबत एमकेसीएलचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरू केला आहे.
यातून मुले रोजगारक्षम बनून तंत्रज्ञानाने समृध्द होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. गावातील विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व त्यांच्या आवडीनुसार कोर्स घेऊन डिजिटल कौशल्य आत्मसात करण्यास मदत होणार आहे. यावेळी जिल्हा समन्वयक संतोष कोलते यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव, आप्पा साळवी, शाळा नं. २ चे मुख्याध्यपक अनाजी मासये, पत्रकार सुरेश गुडेकर, कुणबी सहकारी पतपेढीचे संचालक धनेश कोकरे, सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी, प्रभुदेसाई, ग्रा. सदस्य बाळकृष्ण मिशाले, विजया किंजळसकर, प्रेरणा गुरव, सारिका राणे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 03/Oct/2024