महाकुंभ मेळा: मंत्री नितेश राणे यांचे गंगास्नान

प्रयागराज : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन सपत्नीक पवित्र स्नान केले. सोशल मीडियावर त्यांचे पवित्र स्नान केल्याचे फोटो व्हायरल झाले होते.

आज राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील गंगास्नान करत आपल्या धार्मिक भावना व्यक्त केल्या. नितेश राणेंनी आई निलम राणे यांच्यासह प्रयागराजमधील पवित्र कुंडात डुबकी घेतलीय. नितेश राणेंनी भगवे कपडे आणि गळ्यात माळ घालून पवित्र स्नान कुंडात स्नान केले.

नितेश राणेंची आईसह महाकुंभला हजेरी लावण्यात आली असून येथील पवित्र स्नानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, धर्मांतर विरोधी कायद्यावर भाष्य केलं.

आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणापैकी एक क्षण आहे,असे राणेंनी म्हटले.

हिंदू संस्कृती, परंपरा आणि आईप्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक म्हणून हा भावनिक क्षण माझ्या हृदयात नेहमीच कोरला जाईल. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमात स्नान करून सनातन धर्माच्या गौरवशाली परंपरेचा अनुभव यावेळी घेतल्याचंही मंत्री महोदयांनी म्हटलं.

धर्मांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात समिती स्थापन केल्याबद्दल हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. या कायद्यामुळे असंख्य हिंदुत्ववादी महिला भगिनींना सुरक्षेचं कवच मिळणार आहे, असे राणेंनी म्हटले.

हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करत होत्या. देशात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात येईल, असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो, असेही मंत्री नितेश राणेंनी यावेळी म्हटले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 15-02-2025